Home » महाराष्ट्र » म्हसवे फाट्याजवळ काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत तरुण विवाहितेचा मृत्यू

म्हसवे फाट्याजवळ काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत तरुण विवाहितेचा मृत्यू

पारोळा : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग सहावर बायपासवरील म्हसवे ट्रकने फाट्याजवळ दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (२ जानेवारी) दुपारी सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास घडली.

रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून, शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. हे दांपत्य दुचाकी (एमएच १९ सीके ६२५२) ने जळगावकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहावरील बायपास परिसरातील म्हसवे फाट्याजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी भरधाव ट्रक (एचआर ५८ एफ १३१३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या भीषण अपघातात रूपाली बोरसे यांना डोके, तोंड व कमरेस गंभीर दुखापत झाली, तर शुभम बोरसे यांच्या पायाला व तोंडाला गंभीर इजा झाली. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी जखमींना तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूपाली बोरसे यांना तपासून मृत घोषित केले. शुभम बोरसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, हवालदार डॉ. शरद पाटील व मिथुन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुरुषोत्तम बोरसे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक वसीम इरफान राजपूत (रा. चौरादेव, ता. जि. सहारनपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार डॉ. शरद पाटील करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे सत्र चिंतेचा विषय बनले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *