पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे पडसाद आज पुण्याच्या रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपने पुणे काँग्रेस भवनावर धडक दिली. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी, दगडफेक आणि बाटल्यांची फेक झाली. या संघर्षात काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहे. तसेच गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे विधान केले होते. या विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सकाळी भाजपच्या वतीने या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस भवन या पुण्याच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजप कार्यकर्ते पोहचण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमले होते. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यानंतर काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी आंदोलनादरम्यान भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी अचानक दगडफेक आणि रिकाम्या बाटल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकवाल्या. यामध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांवरही दगडफेक केली, ज्यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. “तुम्ही कार्यकर्त्यांना दगड मारताय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. पोलिसांनी तुम्हाला साथ दिली तरी आम्ही डगमगणार नाही. तुमच्यात दम असेल तर समोर या, हे काय भ्याड हल्ले करताय?” अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आणि पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीचार्जची तयारी दर्शवली आणि दोन्ही गटांना पांगवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आम्ही सध्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या काँग्रेस भवन परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



