जळगाव : प्रतिनिधी
वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनधारकांवर बुधवारी वाहतूक शाखेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच दुचाकी चालविणाऱ्या १५ अल्पवयीन मुलांना वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.

विना हेल्मेट, ट्रीपल सीट, विनापरवाना यासह वेगवेगळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करून ६३ वाहनांना दंड केला. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.
महाविद्यालय, क्लासेस परिसरातही मोहीम राबवून दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना रोखण्यात आले. एकूण १५ मुलांना दुचाकीसह वाहतूक शाखेत आणले व पालकांना बोलविले. पहिलीच वेळ असल्याचे सांगत मुलांच्या पालकांना समज देऊन सोडण्यात आले. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली



