Home » महाराष्ट्र » सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा कोण सांभाळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर हा प्रश्न सुटला असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता मुंबईतील लोकभवनात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

सुनेत्रा पवार या राज्याच्या १३ व्या उपमुख्यमंत्री ठरल्या असून, त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने लोकभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांनी लग्नानंतर राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला अधिक प्राधान्य दिले. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अजित पवार यांनीही विविध भाषणांत सुनेत्रा पवार यांची आपल्या जीवनातील मोलाची साथ असल्याचा उल्लेख वेळोवेळी केला होता.

१८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार या राजकीय पार्श्वभूमीच्या कुटुंबातून येतात. १९८५ मध्ये त्यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आणि संपूर्ण गाव या अभियानात सहभागी करून घेतले.

या प्रयत्नांमुळे काटेवाडी गावाने राज्यात ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. या कार्याची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली. महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. बारामतीतील एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया आणि बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी लढवली होती. पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आणि त्या खासदार झाल्या. राज्यसभा सदस्य म्हणून काम करत असतानाच त्यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार यांच्या नावावर ‘महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री’ असा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *