Home » जळगाव » अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस अधीक्षकांचा थेट कारवाईचा बडगा : महसूल विभागाचे मौन संशयास्पद !

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस अधीक्षकांचा थेट कारवाईचा बडगा : महसूल विभागाचे मौन संशयास्पद !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी दुपारी स्वतः पुढाकार घेऊन अशा बेकायदा वाळू वाहतुकीवर थेट कारवाई करत प्रशासनाला सजग केले.

बुधवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास डॉ. रेड्डी हे घरी जेवणासाठी जात असताना आकाशवाणी चौकातून भरधाव वेगाने जाणारा ट्रक (एमएच १९ झेड २४४४) त्यांच्या नजरेस पडला. ट्रकचा वेग आणि संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी तत्काळ वाहन थांबवले आणि जिल्हापेठ पोलिसांना ट्रक ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला आणि महसूल विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.  तहसीलदारांच्या सूचनेनंतर म्हसावद मंडळाधिकारी अभिजित येवले यांनी पथकासह पोलिस ठाण्यात पोहोचून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, या घटनेला दोन दिवस उलटूनही महसूल विभागाकडून संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गिरणा नदी पात्रातून दिवस-रात्र सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन हे सर्वज्ञात असताना महसूल विभाग मात्र या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. या संपूर्ण प्रकरणाने महसूल विभागाचे काही बडे अधिकारीच या वाळू माफियांच्या पाठिशी आहेत का, असा संशय अधिक दृढ होत आहे. नियमांचे उल्लंघन करून सरकारी महसूलाला तडा देणाऱ्या अशा वाळू माफियांविरोधात जिल्हा पोलिसांनी पुढाकार घेतला असताना महसूल विभाग मात्र मौन बाळगत असल्याने प्रशासनावर नागरिकांचा रोष वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात ठोस आणि निष्पक्ष कारवाई होईल का, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *