Home » ताज्या » ‘त्या’ महिलेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

‘त्या’ महिलेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४८ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिला व खून करणारा संशयित आरोपी उंदीरखेडा (ता. पारोळा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केलेले नाही. शोभाबाई रघुनाथ कोळी असे या मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सुमठाणे शिवारात दि. २५ रोजी सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने सखोल चौकशी करत मोबाइलच्या आधारावर महिलेचा शोध लावला.

खून झालेल्या महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी (४८) असून पतीसोबत ती उंदीरखेडा येथे राहत होती. त्यांचा मुलगा अंकलेश्वर या ठिकाणी राहतो. त्याची तब्येत बरी नसल्याने महिलेचे पती रघुनाथ कोळी यांना मुलाकडे पाठविले होते. त्यामुळे कदाचित महिला घरी एकटीच असल्याने आरोपीने याचा डाव साधत महिलेचा खून केल्याचा संशय आहे. हा खून कशामुळे व कुठल्या कारणामुळे झाला, याचा उलगडा अजून झालेला नाही. खून करणाऱ्या संशयितास पारोळा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *