जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया (वय अंदाजे ५०) यांचा आज (दि.१०) सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास राजकुमार कावडिया हे नेहमीप्रमाणे मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान त्यांना छातीत दुखू लागल्याने नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, कावडिया यांच्या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विषप्राशन केल्याची चर्चा असून, मृत्यूपूर्वी त्यांनी काही चिठ्ठी लिहिल्याचेही समजते. मात्र, पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून जामनेरमधील पळसखेडा बुद्रुक शिवारात असलेल्या प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी महाविद्यालयाची परवानगी प्रशासनाने रद्द केली होती. संबंधित इमारत अतिक्रमणात असल्याचे सांगून मंगळवारी ती इमारत पाडण्याची कारवाई होणार होती. त्याआधीच संस्थाचालक राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूची घटना घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



