मुंबई : वृत्तसंस्था
तमिळ भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्याविरोधात बोलाल, तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू,” असा स्पष्ट इशारा देत सेल्वन यांनी आपली ताकद दाखवून दिली. सायन-कोळीवाडा परिसरात काल भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. ‘थैपूसम’ उत्सवानिमित्त आयोजित भव्य ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅलीत हजारो भाविक सहभागी झाले होते. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली.

या रॅलीच्या माध्यमातून सायनमधील तमिळ समुदायाची एकजूट आणि ताकद दाखवून देण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तमिळ सेल्वन म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने तमिळ बांधवांच्या विरोधात वक्तव्य केले होते. आजची ही गर्दी आणि ही रॅली त्या वक्तव्याला दिलेले उत्तर आहे. आम्हाला विनाकारण वाईट बोलू नका, अन्यथा त्याचे परिणाम काय असू शकतात, हे आज स्पष्ट झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या एका महिन्यात मुंबईत एक लाख तमिळ बांधवांची याहूनही मोठी रॅली काढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे तामिळनाडूतील नेते अण्णामलाई यांनी “मुंबई महाराष्ट्राची नाही,” असे वक्तव्य केले होते. यावर संतप्त प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत जोरदार टीका केली होती. मात्र या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंच्या तमिळ भाषिकांवरील वक्तव्यामुळे तमिळ–मराठी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.



