Home » जळगाव » ‘एक लाखाचे दहा लाख’ आमिषाचा पर्दाफाश; फसवणूक टोळीवर धडक कारवाई !

‘एक लाखाचे दहा लाख’ आमिषाचा पर्दाफाश; फसवणूक टोळीवर धडक कारवाई !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

समाजमाध्यमांवर ‘एक लाखाचे दहा लाख’ देण्याचे आमिष दाखवून देशातील विविध भागातील नागरिकांना फसवणाऱ्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नकली नोटांसह ५ मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  फेसबुक, व्हिडिओ रिल्स आणि अन्य सोशल प्लॅटफॉर्मवरून सोन्याची नाणी, नागमणी, रेड मर्क्युरी, काळी हळद, उलटी वासना आदींच्या नावाखाली आर्थिक प्रलोभन देत अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. कुऱ्हा दुरक्षेत्रातील मधापुरी, हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा, चारठाणा परिसरात अशा गुन्हेगारवृत्तीच्या लोकांनी नागरिकांना बोलावून त्यांना मारहाण करत लूट केल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद झाल्या होत्या. त्यानुसार अशा प्रकारच्या व्हिडिओंचा मागोवा घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. दरम्यान, २५ डिसेंबरला सकाळी सावरिया सेट या फेसबुक प्रोफाईलवरून ‘एक लाख का दस लाख मिलेंगा, खरीदना है वही कॉल किजीए’ असा २८ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या रिलमध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, यात तीन आरोपींचा सहभाग उघडकीस आला. यात अटक केलेल्यांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांचा समावेश आहे. यापैकी देवकुमार भोसले व सुजाता भोसले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवकुमार भोसलेचा तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. आशिष आडसूळ, स.पो.नि. राजेंद्र चा-टे, पो.उ.नि. नयन पाटील आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

अटकेदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेल्या ५०० रुपयांच्या १ हजार ६५ नोटा आणि ५ अॅन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत केले आहेत. या नोटांचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांवर गुन्हा नोंदवला आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *