Home » जळगाव » वावडदा गावाजवळ भीषण अपघात : दोन तरुण ठार तर एक गंभीर !

वावडदा गावाजवळ भीषण अपघात : दोन तरुण ठार तर एक गंभीर !

जळगाव : प्रतिनिधी

जळगावकडे निघालेल्या दुचाकीला जळगावकडून येणाऱ्या एका मालवाहू चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील भावेश गोरख पाटील (वय ३५) व योगेश उर्फ महेंद्र वसंत जाधव (वय ३८, दोघ रा. पाथरी, ता. जळगाव) हे दोघ जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेला संदीप शांताराम भिल (वय ३५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता वावडदा गावाजवळ घडली.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पाथरी येथे राहणारे भावेश पाटील, योगेश उर्फ महेंद्र जाधव व संदीप भील हे तिघे गुरुवारी दुपारच्या सुमारास दुचाकीने जळगावाला येत होते. वावडदा गावाजवळ आले असता, जळगावकडून वावडदाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १९, सीझेड ४२४६) क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघंजण दुर फेकले गेले. या अपघातात भावेश गोरख पाटील व योगेश वसंत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप शांताराम भिल हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पाथरी येथील रहिवाशी राहुल पाटील, पंडीत महाजन, पोलिस पाटील संजीव लंगरे व योगेश सोनवणे यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली.

दरम्यान, जखमी झालेल्या तिघांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी भावेश पाटील व योगेश जाधव यांची तपासणी केली असता, त्यांना मयत घोषीत केले तर गंभीर जखमी झालेल्या संदीप भील याच्यावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाथरी येथील दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह पाथरी ग्रामस्थांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी दोघांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *