जामनेर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.सिमेंट मिक्सर ट्रक आणि पॅगो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर परिसरात हाहा:कार उडालेला बघायला मिळाला. प्रचंड आक्रोश आणि किंचाळ्या बघायला मिळाल्या. या घटनेनंतर तातडीने स्थानिक नागरीक आणि रस्त्याने जाणारे काही नागरीक मदतीसाठी धावले. पण या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात ही भीषण अपघाताची घटना घडली. सिमेंट मिक्सर ट्रक आणि पॅगो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सिमेंट मिक्सरने पॅगो रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात निकिता गोपाळ निंबाळकर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ती चिंचखेडाची रहिवासी होता. यासोबतच तळेगावचे 32 वर्षीय रहिवासी प्रमोद श्रीराम गुरूभैया यांचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निकीता निंबाळकर या तरुणीचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. त्यामुळे निंबाळकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. निंबाळकर कुटुंब भुसावळ येथे लग्न समारंभ आटोपून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घरी परतत होते. एकाच पॅगो रिक्षात 8 ते 10 प्रवासी असल्याची माहिती असून गारखेडा जवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात 16 वर्षीय जयेश गोपाळ निंबाळकर, 39 वर्षीय सरला गोपाळ निंबाळकर, 45 वर्षीय चिंचचे रहिवासी योगेश विठ्ठल गायकवाड, नांभाजी नगरचे 50 वर्षीय सुरेखा विलास कापडे, तसेच उत्तर प्रदेशचे 50 वर्षीय रहिवासी अखिलेश कुमार आणि संभाजीनगरच्या 50 वर्षीय महिला संगीता सुभाष चौधरी हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती डॉक्टर चांदा यांनी दिली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.



