यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

मृताचे नाव संतोष उखई धनगर (वय ५५, रा. टाकरखेडा) असे आहे. भुसावळहून यावलकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १९ डीक्यू ७३६९) जात असताना ट्रक (क्रमांक एमएच ३४ बीजी ५०१५) ने जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच अंजाळे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच वळणावर काही दिवसांपूर्वी आणखी एक मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण आहे. यावेळी अंजाळे येथील आनंद सपकाळे यांनी सांगितले की, “पूर्वी येथे घाट होता तरी अपघात कमी होते. आता रस्ता सरळ करूनही याठिकाणी वळण जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे. यामध्ये रचनात्मक त्रुटी असून निष्पाप जीव जात आहेत.” तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे.
यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. याप्रकरणी दीपक धनगर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे



