Home » जळगाव » खंडेरायाच्या गडाखाली भीषण दुर्घटना; विजय जल्लोषात आगीचा भडका

खंडेरायाच्या गडाखाली भीषण दुर्घटना; विजय जल्लोषात आगीचा भडका

जेजुरी : प्रतिनिधी

जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सुरू असलेला आनंदोत्सव आज दुपारी अचानक भीषण दुर्घटनेत बदलला. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी विजयाचा भंडारा उधळत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांसह एकूण १६ जण गंभीररीत्या भाजले. या जखमींवर जेजुरीतील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण जेजुरी शहरात खळबळ उडाली असून आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे.

रविवारी नगरपरिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जेजुरीत मोठा विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विजयी उमेदवार खंडेरायाच्या गडाच्या पहिल्या पायरीजवळ जमले होते. खंडेरायाला भंडारा अर्पण करत असताना बाजूला फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू होती. त्याचवेळी भंडाऱ्याची उधळण सुरू असताना फटाक्यांच्या ठिणगीमुळे भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच आगीचा मोठा लोळ उठला.

भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक भेसळ असल्यामुळेच ही आग इतक्या तीव्रतेने भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उपस्थितांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या घटनेत भाजलेल्या १६ जणांमध्ये काही नवनिर्वाचित नगरसेवकांचाही समावेश असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माजी आमदार संजय जगताप यांचा जेजुरीतील बालेकिल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्ध्वस्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. नगरपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १७ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले, तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या दुर्घटनेनंतर जेजुरीतील भंडाऱ्याच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडाऱ्यात भेसळ होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही वारंवार करण्यात आल्या होत्या. आज भंडाऱ्याने ज्या प्रकारे पेट घेतला, त्यावरून त्यात ज्वालाग्राही रसायनांचा वापर झाल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, पोलिस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *