Home » जळगाव » २९ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !

२९ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी

चप्पल घेण्यासाठी जातो सांगून घरातून बाहेर पडलेल्या रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, मध्यप्रदेश, ह. मु. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाचा पाच दिवसानंतर मृतदेह कुजलेल्या अवस्थे मिळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी साडनऊ वाजता विमानतळाच्या मागील बाजूस शेताच्या बांधावर घडली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

मध्यप्रदेशातील रामू वास्कले हा तरुण पत्नी व मुलांसह कुसुंबा येथे वास्तव्यास आहे. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात तो सालदार म्हणून काम करुन तो तेथेच वास्तव्यास आहे. दि. २६ रोजी तो पत्नीला मी गावात चप्पल आणण्याकरीता जात आहे असे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत देखील तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तरी देखील तो मिळून आला नव्हता. गुरुवार दि. ३१ रोजी सकाळच्या सुमारास नशिराबाद शिवारातील विमानताळाच्या मागे असलेल्या आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर रामू वास्कले याचा कुजलेला मृतदेह मिळून आला.

गावातील काही तरुण हे रानभाजी शोधण्याकरीता कुसुंबा विमानतळाच्या मागील बाजूस गेले होते. त्याठिकाणी त्यांना एक कुजलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानुसार पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तो मृतदेह पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रामू वास्कले याचा असल्याचे समजले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयताच्या डोक्याला जखम झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. मयत रामू वास्कले हा गेल्या अनेक वर्षांपासून सालदारकी करीत आहे. अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा थेट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. पंधरा महिन्याच्या मुलाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *