जळगाव : प्रतिनिधी
गणपती विसर्जनासाठी गेलेला असताना गिरणा नदीत बुडालेल्या राहुल रतिलाल सोनार (३४, रा. वाघनगर) या तरुणाचा चार दिवसांनंतर, बुधवारी (१० सप्टेंबर) सावखेडा शिवारात मृतदेह आढळून आला. दुसरीकडे, भोकणी शिवारात बुडालेल्या गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) याचा अद्यापही शोध लागलेला नाही.

सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी (६ सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी गेल्यानंतर राहुल सोनार हा गिरणा पंपिंग परिसरात, तर ममुराबाद येथील गणेश कोळी हा तरुण भोकणी शिवारात गिरणा नदीपात्रामध्ये बुडाला होता. त्यांचा तेव्हापासून शोध घेण्यात येत होता. परंतु, पथकाला यश येत नव्हते. पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना यासाठी पाचारण करण्यात आले होते. या दरम्यान, राहुल रतिलाल सोनार (३४, रा. वाघनगर) या तरुणाचा चार दिवसांनंतर, बुधवारी (१० सप्टेंबर) सावखेडा शिवारात मृतदेह आढळून आला आहे.



