Home » जळगाव » ‘त्या’ दाम्पत्याचा मृतदेह मलकापूरनजीक विहिरीत आढळला !

‘त्या’ दाम्पत्याचा मृतदेह मलकापूरनजीक विहिरीत आढळला !

मलकापूर : वृत्तसंस्था

तेलंगणातील सीतापुरम येथून पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा या आपल्या मूळ गावी लग्न समारंभासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा शनिवारी दुपारी शोध लागला. खामगाव ते मलकापूर मार्गावरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह दाम्पत्याचा मृतदेह आढळला. पद्मसिंह दामू पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) अशी या मयत दाम्पत्याची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील सीतापूरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह पत्नीसह एमएच १३ बीएन ८४८३ या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी २७नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. त्याच दिवशी सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाइकांशी शेवटचा संपर्क झाला; मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांत चिंता वाढली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत २७ रोजी सायंकाळी ६:३१ वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले, तर शेवटचे लोकेशन नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले. त्यानंतर नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली.

अखेर शनिवारी दुपारी २:२० वाजताच्या सुमारास वडनेर उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नांदुरा-मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नव्हती. शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा व डीवायएसपी आनंद महाजन यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात याबाबत आढावा घेतला. पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम तीव्र करण्यात आली तरीही दुपारपर्यंत काहीच सुगावा लागला नव्हता.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *