Home » जळगाव » दोन चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील पाच जणांची जामिनावर सुटका

दोन चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील पाच जणांची जामिनावर सुटका

भडगाव : प्रतिनिधी 

येथील आदर्श शाळेनजीक घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत दोन निरागस बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांची औरंगाबाद खंडपीठाने मानवी दृष्टिकोनातून विचार करत जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श कन्या शाळेतील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे अंश सागर तहसीलदार (वय ३) व मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४) हे दोन चिमुकले शाळेजवळील संरक्षक भिंतीलगत असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी शाळा संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांतर्गत संस्थेचे मानद सचिव दीपक संभाजी महाजन, सह-सचिव रमेश एकनाथ महाजन, उपाध्यक्ष विनोद शिवराम महाजन, संचालक रवींद्र एकनाथ महाजन व मनोज कौतिक महाजन तसेच प्राचार्या सोनिया भादू वंजारी यांना १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी नंदुरबार कारागृहात करण्यात आली होती. सदर आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवार, दि. २ रोजी न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने शाळेच्या परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नगरपरिषदेकडे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करत तसेच प्रकरणातील परिस्थितीचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अॅड. व्ही. डी. होन व अॅड. भूषण महाजन यांनी काम पाहिले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *