जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे (३०) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या वादातून खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघे रा. निमखेडी) या दोन जणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, सागर सोनवणे याचे चार वर्षापासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याविषयी त्याला वारंवार समजावून महिलेशी संबंध तोडण्याविषयी सांगितले. मात्र तो कोणाचेही ऐकत नव्हता. महिलेच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सागर व अनिल सखाराम नन्नवरे यांच्यात अनेक वेळा वाद झाले. रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता पुन्ह अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर (दोघेही रा. निमखेडी) यांचा सागरसोबत पुन्हा जोरदार वाद झाला. त्यावेळी दोघांनी ‘महिलेचा नाद सोड नाहीतन तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी सागरला दिली होती.
या धमकीनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास मंदिराच्य जवळ सागर सोनवणे याला गाठले व शस्त्राने वार केले. यामुळे सागर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्या वेळी सागरचा भाऊ विशाल सोनवणे आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
या प्रकरणी मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनिल सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



