मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला. मान्सूनने दमदार आगमन केलं. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पण विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा कोसळणार आहे. पुढचे दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, कोकणात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथा भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण राज्यात २५ तारखेनंतर पाऊस कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात हलका-मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
इतर राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. दोन दिवसानंतर राज्यात पडणारा मोठा पाऊस कमी होणार आहे. मान्सून अतिशय वेगाने यंदा ५ जुलैच्या सुमारास दाखल झाला. यावेळी मान्सून अनेक राज्यात लवकर दाखल झाला. पुढील चार-पाच दिवस पावसाचे आहेत. येणारे दोन दिवस पावसाची तीव्रता जास्त आहे. त्यानंतर पाऊस कमी होईल. उत्तर भारतातील काही राज्यात पाऊस सुरू झाला आहे. मान्सून १ जूनला केरळात आल्यानंतर ८ जुलैपर्यंत देश व्यापतो. मात्र यावेळेस ३० जूनपर्यंत मान्सूनने देश व्यापला.
प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवार आणि मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. फक्त मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील. पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या पावसाचा जोर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागात जास्त असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून होईल, असा अंदाज आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणातून आता 3 हजार 944 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपत्रात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे.
दरम्यान मुंबईत समुद्राला भरती आली आहे. आज 4.37 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच मुंबईत मरिन ड्राइव्ह भागात समुद्र खवळलेला बघायला मिळाला आहे. मुंबईकरांना दुपारी 2.33 ला भरतीच्या वेळेत समुद्र किनार्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या वेळेस 4.37 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. आज मरीन ड्राईव्ह, वांद्रा वरळी सी लिंक वर समुद्राला उधाण आलेलं चित्रं पहायला मिळालं आहे. तरुणाईने रिमझिम पावसात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राईव भागात गर्दी केलेली आहे. दरम्यान, यावेळी समुद्र किनारी अप्रिय घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. तर समुद्र खवळलेला असून उंच लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत
