जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला असून हा मृतदेह महिलेचा नसून आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, खैरागड, छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंधासाठी तगादा लावल्याच्या कारणातून गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याने खून केल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दि. ४ फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात अर्धवट जळालेला व नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परिसर दुर्गम व मोबाईल नेटवर्कविरहित असल्याने तपास अधिक कठीण झाला होता.
मात्र मृतदेहाच्या पायाच्या नखावरील नेलपॉलिश व नाकातील सोन्याची ‘मुर्ती’ या तपशीलांमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचा महत्त्वाचा धागा मिळाला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फॉरेन्सिक तपासणीत मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी, म्हणजे ३० किंवा ३१ जानेवारीदरम्यान झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत असे उघड झाले की संशयित स्वप्नील पाटील याने तृतीयपंथीय आकांक्षा याला पद्मालय येथे गणपती दर्शनासाठी नेले. त्यानंतर जंगलात मद्यप्राशन करत असताना वाद झाला. रागाच्या भरात संशयिताने आकांक्षा याच्या डोक्यावर प्रहार करून गळा आवळून हत्या केली.
हत्या केल्यानंतर ओळख पटू नये व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दुचाकीतील पेट्रोल टाकून मृतदेह जाळून कपडे काढून टाकल्याची कबुली संशयिताने दिली आहे. पोलिसांनी भौतिक व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



