कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे आहे. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदीर शाळेत झाले. त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये 96 टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगूड केंद्रात पहिला आला.
त्यानंतर मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. बारावीमध्येही 89 टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपीमधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शाळेत असल्यापासूनच आयपीएस व्हायची त्याची इच्छा होती. बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होत चालले होते. तेव्हा बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणेने त्याचा आर्थिक खर्च उचलला. वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे.
बिरदेवने दोन वर्षे दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. दोन वेळा अपयश आल्यानंतरही तो खचला नाही. त्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता.यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला , त्यावेळी बिरदेवनेत्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आई-वडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यासंह गेला होता. निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला. काहीही झाले तरी आयपीएस व्हायचेचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या बिरदेवने यशाला गवसणी घातली.
