जळगाव : प्रतिनिधी
कचरा उचलण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुनिल मदन परदेशी (वय २५, रा. कंडारी, ता. जळगाव) यांना तिघांनी लाकडी बांबू डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कंडारी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथे सुनिल मदन परदेशी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २९ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात उभा होता. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे आनंदीबाई सोनवणे यांना कचरा उचलण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संदीप सोनवणे व त्याच्यासोबत राहणारे साथीदार दगडू चिंचोले, रविन सुभाष पवार, सुरेश चिंचोले यांनी सुनिल परदेशी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.
यावेळी दगडू चिंचोले याने लाकडी बांबू सुनिलच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी सुनिलचा भाऊ अनिल परदेशी व आई कलाबाई हे त्यांना आवरण्यासाठी गेले असता, त्यांना देखील शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सुनिल परदेशी याने नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहे.



