सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यकरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख होता. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळे मी जीव देत आहे, असं लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी आता सर्वच स्तरावर होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृहखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ!
1. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने-महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
2. ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
3. महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
4. हे खासदार महोदय नेमके कोण?
५. या महिला डॉक्टरला बीड वरून हिणवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
6. ‘पारदर्शक’ आणि ‘गतिमान’ शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
7. चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
8. या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?
आज लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. फडणवीस जी, तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात. राजीनामा द्या, असे म्हणत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.



