जळगाव : प्रतिनिधी
बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा पॅन्टच्या खिशातून घेत चोरट्यांनी विद्यार्थ्यांचा मोबाईल लांबविणारा सराईत चोरटा हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी) याच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले तीन महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानक येथे बसमध्ये चढत असतांना दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास निखील राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव) व मयुर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) यासह अन्य एका विद्यार्थीनीचा पॅन्टच्या खिशातून हातचालाखी करीत मोबाईल चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना उघडकीस येताच त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी तीन मोबाईल चोरीस गेल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोनि प्रदिप ठाकूर यांनी चोरट्यांचा शोधार्थ महिला पोहेकॉ भारती देशमुख, पोकॉ राहुल पाटील व नरेंद्र दिवेकर यांचे पथक तयार केले. या पथकाने शोधमोहीम राबविली असता, त्यांना संशयित हमीद आयुब खान हा सराईत चोरटा संशयास्पदरित्या फिरतांना दिसला. संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सराईत चोरटा हमीद खान याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने तीन चोरलेले मोबाईल काढून दिले. या चोरट्याविरुद्ध यापुर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे समोर आले आहे.



