जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीयांसह पाटणा येथे मूळ गावी गेलेल्या मनीषकुमार सिंग (३७, रा. देवेंद्रनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबर रोजी समोर आला असून रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषकुमार सिंग हे जळगावातील आयकर विभागात कार्यरत आहेत. २० नोव्हेंबर रोजी ते पत्नी व दोन मुलींसह पाटणा येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजावरील कुलूप तोडले. आत प्रवेश करून कपाटातील चार ग्रॅम वजनाचे कानातील टोंगल, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, एक ग्रॅमचे पेंडल असे एकूण ४८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
२६ नोव्हेंबर रोजी सिंग यांचा मित्र झाडांना पाणी देण्यासाठी घराजवळ आला असता दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. तात्काळ त्याने सिंग यांना याची माहिती दिली. ८ डिसेंबर रोजी सिंग कुटुंब गावीहून परतल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.



