बोदवड : प्रतिनिधी
बोदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना आता सोने, चांदी किंवा रोकड मिळाली नाही तर ते घरातील गव्हाचे पीठ आणि हिवाळ्यासाठी बनविलेले मेथीचे लाडूही घेऊन जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मनूर गावात एकाच रात्री सात घरफोड्या झाल्याने संतापासोबतच या विचित्र प्रकाराबाबत चर्चा आणि थोडी गंमतही रंगत आहे.

१४ ऑक्टोबर रोजी नाडगाव येथे चार घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २५ तोळे सोने लंपास केले. त्यानंतर ३० ऑक्टोबरला पुन्हा नाडगावात चार घरे फोडत सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पाच तोळे सोने चोरून नेले. ५ नोव्हेंबर रोजी सोनोटी-नाडगाव शेतशिवारातून ११ शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार मीटर केबल चोरीस गेल्या. ३ डिसेंबरला शहरातील व्यापारी संकुलातील दोन दुकाने फोडण्यात आली. ताज्या घटनेत मंगळवार, १६ डिसेंबर रोजी रात्री मनूर गावात सात घरे फोडून चोरट्यांनी ३० ग्रॅम सोने, ३५ भार चांदी व ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. विशेष म्हणजे विठ्ठल शेळके यांच्या घरातील मेथीचे अर्धा डबा लाडू आणि गव्हाचे पीठही चोरट्यांनी सोडले नाही.
वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले असले तरी अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



