अमळनेर : प्रतिनिधी
घराबाहेर झोपलेल्या शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी कपाटच लांबवले. यात २ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना ३० रोजी मध्यरात्री तालुक्यातील खवशी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खवशी येथे शिक्षक सिद्धार्थ वसंत शिरसाठ बुधवारी रात्री घराबाहेर झोपलेले होते. रात्री तहान लागल्याने ते घरात जात होते. परंतु दरवाजा आतून बंद होता. मागे जाऊन पाहिले असता मागील घराचे दरवाजे उघडे होते.
त्यांनी आत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटच गायब झालेले दिसले. या कपाटात रोख रक्कम १ लाख ८० हजार रुपये, ४५ हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे टोंगल, १५ हजार रुपयांचे सोन्याचे दोन काप व सोन्याची पोत अशा वस्तू होत्या. १२ हजार किमतीची सोन्याची अंगठी ३ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या कानातील बाह्या, ३ हजार रुपये किमतीची सोन्याची नथ असा एकूण २ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला सिद्धार्थ वसंत शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



