जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉपजवळ लावलेल्या चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०, रा. नवीपेठ) या मालकीच्या वाहनाची काच फोडून आणि त्या वाहनाचे मागील दरवाजाचा कडीकोंडा कापून ४ लाख २ हजार रुपयांचे सिगारेट चोरट्यांनी लांबवले. ही घटना दि. २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नवीपेठ परिसरात चंद्रशेखर जवरीलाल राका हे वास्तव्यास असून त्यांचे सी. जे. ट्रेडिंग कंपनी नावाने पानमसाला व सिगारेट माल विक्रीचे होलसेल दुकान आहे. त्यांच्या दुकानावर मेघरराज चौधरी हे मॅनेजर म्हणून तर अशफाक यूनुस पिंजारी (रा. असोदा, ता. जळगाव), शंकर दामू जाधव (रा. हरिविठ्ठलनगर), ऐतेशाम फहीम पटेल (रा. शिवाजी नगर), जयेश गजानन निंबाळकर (रा. सिंधी कॉलनी), दिलीप निंबा बाविस्कर (रा. वाल्मिक नगर), मनोज दिगंबर वाणी (रा. पिंप्राळा), ज्ञानेश्वर रमेश कोळी (रा. वाल्मिक नगर) हे काम करतात. राका यांच्याकडे (एमएच १९, सीवाय ०१२३) व (एमएच १९, सीवाय ०१२३) क्रमांकाचे दोन मालवाहू वाहन आहे. दिवसभरात जिल्हाभरातून आलेल्या ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सायंकाळी गाडीत माल लोड केला जातो. त्यानंतर हे वाहन गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ नितीन लढा व चंद्रशेखर राका यांच्या मालकीच्या जागेवर लावतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रायव्हर, सेल्समन आणि हमाल ते वाहन घेवून ऑर्डरीप्रमाणे त्याचा पुरवठा करतात.
दि. २७ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास (एमएच १९, सीवाय ०१२३) क्रमांकाच्या वाहनावरील चालक ज्ञानेश्वर रमेश कोळी यांनी व (एमएच १९, सीवाय ०१२३) क्रमांकाच्या वाहनावरील चालक शंकर जाधव यांनी माल लोड करुन दोन्ही वाहने गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ लावून घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी दि. २८ रोजी सकाळी ९ वाजता शंकर जाधव हे मालक चंद्रशेखर राका यांच्या घरी गेले. त्यांनी एका वाहनाचा कडीकोयंडा कापलेला असून त्यातील माल चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार चंद्रशेखर राका हे मुलगा रिषभ याच्यासोबत लागलीच वाहने लावलेल्या ठिकाणी गेले. शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत फुटेज ताब्यात घेतले. त्यामध्ये चोरटे चोरी करतांना कैद झाले असून ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. फुटेजवरुन पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात असून ही टोळी बाहेरील जिल्ह्यातील असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.



