जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी नगरात राहणारे गणेश भगवान माळी हे ३० नोव्हेंबर रोजी सहकुटुंब मूळ गावी गेले होते. ४ डिसेंबर, गुरुवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या आशा भोई यांनी माळी यांना फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेला असल्याची माहिती दिली. माळी कुटुंबियांनी तात्काळ घरी धाव घेतली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३ तोळे सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र आणि ६ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी त्याच गल्लीतील सुनिल रामदास सुरवाडे यांचेही बंद घर फोडले. सुरवाडे यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटेच्या सुमारास तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले चार संशयित चोरटे कैद झाले आहेत. एकाच रात्री दोन घरे फोडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.



