बीड : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातील पाहणीने केली. रुग्णालयात नव्याने उभारलेल्या विभागांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पाहणी करत असताना एका ठिकाणी भिंतीवर सिमेंट आणि एसीच्या खालील भाग नीट न लावलेला दिसला. यावर मी आज दुपारी वेळ काढतो आणि सिमेंट लावायला, टचअप करायला येतो, अशा शब्दांत अजित पवारांनी उपस्थित डॉक्टरांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सुनावले.

अजित पवार हे बीड जिल्हा रुग्णालयात नवीन झालेल्या कामाची पाहणी करत होते, पाहणीदरम्यान एका विभागात भिंतीवरील सिमेंट आणि एसीखालील भाग व्यवस्थित न केल्याचे लक्षात आले. याबाबत अजित विचारणा केली असता, तेव्हा उपस्थितांनी उत्तर दिले की सिमेंट नीट झालेले नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, आज दुपारी मी वेळ काढतो आणि तिथे मी लावायला येतो आणि मी टचअप करायला येतो. हे काम तुमचे नाही. जे कोणी पीडब्ल्यूडीचे इंजिनिअर वगैरे आहे, त्यांची ही कामे आहेत. त्यांना आपण पैसे देतो. महिन्याच्या महिन्याला आपण त्यांना पगार देतो. मी ही डॉक्टरांची काम आहेत असे म्हणणारच नाही. ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो, त्यांची ही कामे आहेत.
एकीकडे कामातील त्रुटींवरून अधिकाऱ्यांना झापले असतानाच, अजित पवारांनी काही चांगल्या कामांबद्दल कौतुकही केले. दरवाज्याची उंची चांगली दिली. बरेच चांगले काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल दुमत नाही. त्याबद्दल मी समाधानी आहे. पण बारीक सारीक गोष्टी राहिल्या आहेत, असे त्यांनी म्हटले. याचवेळी त्यांनी स्वच्छता आणि शिस्तीबाबतही अधिकाऱ्यांना ताकीद दिली. “कोणीही बूट-चप्पल घालून आत यायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अचूकता हवी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.



