जळगाव : प्रतिनिधी
हॉटेलमध्ये जेवण करताना परेश संजय महाजन या तरुणाला ‘चोर पऱ्या’ बोलण्याच्या कारणावरून वाद होऊ तीन जणांनी हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर) याला मारहाण करून रेल्वे रुळावर टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूषण संजय महाजन (३१, रा. ज्ञानदेव नगर) याला अटक करण्यात आली आहे. इतर दोन जणांचा शोध सुरू आहे.

हर्षल भावसार याचा सोमवारी जळगाव ते भादली मार्गावर रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला होता. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले असता त्यात अनेक बाबी समोर आल्या.
पोलिसांनी तपास केला असता हॉटेलमध्ये बसल्यानंतर हर्षल हा परेश महाजन याला चोर पऱ्या बोलल्याच्या कारणावरून त्याचा भूषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत वाद झाला. दोघांनी त्याला हॉटेलमध्ये मारहाण केली. त्यानंतर हर्षल तेथून निघून गेला. मारहाण करणाऱ्यांसह परेश महाजनने हर्षलला का.ऊ. कोल्हे शाळेजवळ पकडले. तेथून दुचाकीवर बसवून त्याला असोदा शिवारातील शेतात नेऊन मारहाण केली व त्याला रेल्वे रुळावर फेकून दिले. यावेळी रेल्वेची धडक लागल्याने हर्षलचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मयताच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूषण महाजन याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने हर्षलला मारहाण केल्यानंतर रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत



