भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील दीपनगर येथे राखेचे कंत्राट का घेतले, याचा जाब विचारत सुपरवायझरसह तिघांना मारहाण करण्यात आली आणि पाच हजार दोनशे रुपये लुटले. ही घटना ७ रोजी दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर दुपारी पाच वाजता घडली. या प्रकरणी निंभोऱ्याच्या तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख अशफाक शेख सगीर (३३, रा.ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित दीपक मधुकर हातोले, किरण मधुकर हातोले आणि दिनेश त्र्यंबक खंडारे (सर्व रा. निंभोरा, ता. भुसावळ) यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता दीपनगर प्रकल्प गेट समोर तक्रारदाराच्या अत्रेय कंपनी, नाशिक यांनी फ्लॅशचे (कोरडी राख) कंत्राट का घेतले? म्हणत वाद घातला, तसेच कंपनी बल्करद्वारे फ्लॅश (कोरडी राख) वाहतूक का करते, असे विचारत शेख अशफाक शेख सगीर यांच्या तोंडावर, तसेच डोक्यावर उजव्या बाजूस रॉडने व फाइटरने मारून दुखापत केली. तक्रारदारासोबतच्या अब्दुल अदनान, अब्दुल रहेमान कुरेशी यांच्या उजव्या पायाचे मांडीवर रॉडने मारून व अमर बहादूर सिंह सूर्यबली सिंह यांना आरोपींनी तोंडावर फाइटरने व चापटा मारीत शिवीगाळ केली. किरण मधुकर हातोले याने फिर्यादीच्या खिशातील पाच हजार दोनशे रुपयांची रोकड हिसकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.
