Home » जळगाव » सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून विवाहितांनी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप्ती मगर चौधरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिने काल रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. आत्महत्येप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, दीर तसेच सासू-सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती चौधरी यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. विवाहानंतर सुरुवातीपासूनच तिला सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, दिसण्यावरून टोमणे मारणे तसेच घरकाम येत नाही अशा कारणांवरून सतत अपमान केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या तणावामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या खचली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संसार टिकावा आणि मुलीचे भवितव्य सुरक्षित राहावे म्हणून दीप्तीने अनेक वेळा सहनशीलतेची भूमिका घेतली होती.

या प्रकरणात हुंड्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाकडून 50 तोळे सोने देण्यात आले होते. याशिवाय वाहन खरेदीसाठी 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर नंतरही सासरच्यांच्या मागणीनुसार एकदा 10 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, एवढे करूनही छळ थांबला नाही. पैशांच्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दीप्ती अधिकच अडकत गेली आणि अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सासू आणि पतीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, मृत विवाहितेची सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *