Home » जळगाव » दुर्देवी : क्रेनचा हूक तुटला अन तरुणाचा गेला जीव !

दुर्देवी : क्रेनचा हूक तुटला अन तरुणाचा गेला जीव !

जळगाव : प्रतिनिधी

रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या विविध कामांतर्गत क्रेनद्वारे जुनी बोगी उचलत असताना क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने कैलास रमेश माळी (२७, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु, वंजारी खपाट) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१८ जून) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्सल कार्यालयानजीक घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास माळी व त्याचा लहान भाऊ हे काका गिरधर माळी यांच्याकडे राहत होते. कैलास हा क्रेनवर काम करायचा.

क्रेनचे हुक बोगीमध्ये अडकविले आणि काही वेळातच एका केनचा हूक तुटून तो थेट कैलासच्या डोक्यावर व नंतर गुप्तांगाजवळ पडला. त्यामुळे तो जागीच कोसळला. घटनास्थळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोउनि राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी पोहचले. कैलासला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केले.

कैलास व त्याचे दोन भाऊ लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तिन्ही भावांचा काकांनी सांभाळ केला. दोन वर्षांपूर्वी कैलासच्या भावाचा आजारपणाने मृत्यू झाला व आता कैलासही सोडून गेल्याने त्याचा लहान भाऊ एकटा पडला आहे. कैलास हा या क्रेनवर दीड महिन्यांपूर्वीच कामाला लागला होता. सुरुवातीपासून तो मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करायचा. आता क्रेनवर कामाला लागला आणि दीड महिन्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *