Home » महाराष्ट्र » युतीविना यशाचा ट्रेंड; जळगाव मनपात शिंदे सेनेची ताकद वाढणार?

युतीविना यशाचा ट्रेंड; जळगाव मनपात शिंदे सेनेची ताकद वाढणार?

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लक्षणीय यश मिळवत आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शिंदे सेनेने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, त्या ठिकाणी पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गट स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास, महापालिकेतही त्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची ताकद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांतून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता थेट महापालिकेच्या रणधुमाळीत उतरण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. युतीच्या गणितांपेक्षा ‘स्वबळावर निवडणूक’ हा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो, अशी भूमिका पक्षाच्या अंतर्गत चर्चेत पुढे येत आहे. दरम्यान, जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या हालचालींना वेग आला असून, स्वतंत्र लढ्याचा निर्णय झाल्यास जळगावच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे संकेत मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *