Home » ताज्या » पारोळा तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात तर रुग्णवाहिकेने देखील घेतला पेट !

पारोळा तालुक्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात तर रुग्णवाहिकेने देखील घेतला पेट !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील जोगलखेडे शिवारात दि. २७ रोजी ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेलाही आग लागली. त्यात वाहन जळून खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगलखेडे शिवारात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाला. त्यात विमल सुकल्या वसावे रा. वेलखेडी, जि. नंदुरबार, रोहन विश्राम पावरा, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे व मनीषा जितेंद्र राठोड, जितेंद्र राठोड दोन्ही रा. आडगाव तांडा, ता. पारोळा हे चारही जण जखमी झाले. जखमींना घेण्यासाठी गेलेल्या दोन रुग्णवाहिका गेल्या होत्या. नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानच्या या रुग्णवाहिकेतून चारही जखमींना बसवण्यात आले व पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याचसोबत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहचली होती.

घटनास्थळी रुग्ण नसल्याने १०८ रुग्णवाहिका ही परत येत असताना मेहू -टेहू गावाजवळ रुग्णवाहिकेत अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातील चालक रोशन पाटील यांनी लगेच गाडी उभी करून उडी मारली. काही क्षणातच गाडीने पेट घेतला. नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन कर्मचारी मनोज पाटील यांनी आग नियंत्रणात आणली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *