Home » जळगाव » आरपीएफ पथकाची मोठी कारवाई : आठ संशयितांना घेतले ताब्यात

आरपीएफ पथकाची मोठी कारवाई : आठ संशयितांना घेतले ताब्यात

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून धमकावून पैसे वसूल करणाऱ्या किन्नरांच्या टोळीवर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्याकडून रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून जबरदस्तीने पैसे उकळले जात होते.

सविस्तर वृत्त असे कि, या टोळीतील किन्नर प्रवाशांना धमकी देऊन शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत रक्कम उकळत होते. काही प्रवाशांकडे रोख रक्कम नसल्यास त्यांच्या समोर दफकोड स्कॅनर पुढे करून ऑनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडले जात होते. आरोपींच्या फोन पे व्यवहार तपासले असता, अशा अनेक ट्रान्झेक्शनची नोंद सापडली आहे. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि रेल्वे हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवल्यानंतर, रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एन. राय (क्राईम ब्रांच) आणि निरीक्षक पी. आर. मीना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २५ व २६ जूनच्या रात्री कारवाई केली. या कारवाईत सहा किन्नर आणि त्यांच्या दोन प्रमुख सहकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

गुरुवारी अटक करण्यात आलेल्या चार किन्नर आणि दोन सरगन्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना उपलब्ध पुराव्यांच्या आधारे एक महिन्याची शिक्षा सुनावली असून त्यांना जळगाव कारागृहात हलवण्यात आले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुरक्षा आयुक्त जोशी म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अशा प्रकारची जबरदस्ती आणि त्रास सहन केला जाणार नाही. भविष्यातही अशा टोळ्यांविरोधात कारवाई सुरू राहील.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *