जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून धारदार शस्त्र घेऊन दोन जण एकमेकांवर भिडले व यात धीरज दत्ता हिवराळे (२७, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाला. तर कल्पेश वसंत चौधरी (२५, रा. सम्राट कॉलनी) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता जोशी कॉलनीत घडली. घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण होते.

सविस्तर वृत्त असे कि, सम्राट कॉलनीतील धीरज हिवराळे हा फुले मार्केटमध्ये कामाला होता. तो व त्याच्या घराजवळ राहणाऱ्या कल्पेश चौधरीमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये धुसफुस असायची. रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वाद झाला. त्या वादातून दोघांनी एकमेकांवर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार केले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाना तायडे, किरण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड हेदेखील रुग्णालयात पोहोचले.



