अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरापासून नजीक असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ सती माता मंदिरावरून परत येताना टाकरखेडा रस्त्यावर गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा अपघात होऊन मंगलाबाई ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मधुकर ठाकरे जखमी झाले. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:१० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आर. के. नगर, अमळनेर येथील मधुकर ठाकरे हे त्यांच्या पत्नी मंगलाबाई यांच्यासोबत मोटारसायकलने सती माता मंदिरावर (टाकरखेडा रस्ता) दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परत येताना, रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा तोल गेला व अपघात झाला. या अपघातात मंगलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर मधुकर ठाकरे यांच्या तोंडाला मार लागून ते जखमी झाले.
हा अपघात एवढा मोठा होता की, अपघातानंतर पत्नी मंगलाबाई या दूरवर फेकल्या गेल्याः त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या पतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
