धाराशिव : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून सध्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील ईटकूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धाराशीवमधील इटकूरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगत शेतकऱ्यांना धीर दिला. तसंच शेतकऱ्यांना आलेल्या बँकांच्या वसूली नोटिसांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं.
ठाकरे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. “सध्या जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भावनिक आधार देत म्हटले आहे की, “तुम्ही खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत”. मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आहेत, तसेच सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील, तर त्यांना सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल. शेतकऱ्यांच्या हक्काचे जे काही आहे, ते त्यांना मिळवून द्यावेच लागेल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना पैसे भरायला लावू
बँकेकडून आलेल्या वसुलीच्या नोटिसांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ज्या बँकेकडून नोटिसा आलेल्या आहेत, त्या सर्व नोटिसा एकत्र करून आम्हाला पाठवा. त्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवू. त्यांना सांगू की बाबा हे सगळं तम्ही भरा. जर या बँकांच्या नोटिसा थांबल्या नाहीत तर त्यांची होळी करावी लागेल. या दौऱ्यात खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, तसेच स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
