मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज्यात एकेकाळी काँग्रेसचा दरारा होता. शिवसैनिकांना पोलिसांकडून काँग्रेसमध्ये येण्यासाठी विविध कलमे लावून जेलमध्ये टाकू, अशा धमक्या दिल्या जायच्या. आताही त्याच पद्धतीने पोलिसांचा टोळीसारखा वापर करून पक्ष फाडले जातायत, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
सत्ताधाऱ्यांकडून जुनी प्रकरणे उखडून काढली जात आहेत. समोरील पक्ष हे संपवण्याचे काम केले जात आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण फक्त जातोय, याचा शेवट काय होणार आहे ? मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जर पोलिसांना फ्री हॅण्ड दिला, तर पोलीस चमत्कार करू शकतात. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर तेव्हाही माझा विश्वास होता आणि आजही आहे. मात्र, फ्री हॅण्ड न देता तुम्ही नको तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावता, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, प्रभाकर पवार आपलं पुस्तक चाळत असताना कोणाकोणाचे कसे संबंध आहे, कसे असू शकतात, हे कल्पनेच्या पलीकडले आहे. एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगतो की, ये मेरा काम कर के दो. म्हणजेच त्याला वसुली करायची होती. असे जर का संबंध असतील, तर कर्णिक यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? हा इथून प्रश्न सुरू होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



