मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतीच स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून मराठवाड्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. “दगाबाज रे” या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत.

या दौऱ्याचा उद्देश म्हणजे — शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीचा खरंच फायदा झाला आहे का, हे जाणून घेणे. उद्धव ठाकरे हे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान सलग चार दिवस मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी थेट बांधावर ठाकरे
पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर येथे पोहोचले. येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सरकारकडे त्वरित कर्जमाफी करण्याची मागणी केली. “सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे आणि दिखाऊ आहे. ते तरी लवकर द्या, अन्यथा शेतकऱ्यांना हिवाळ्याच्या हंगामात मोठा फटका बसेल,” असा टोला ठाकरे यांनी लगावला. याच काळात केंद्र सरकारचे एक पथकही राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहे. मंगळवारी त्यांनी मोहोळ परिसरात पाहणी केली असून, बुधवारी ते सोलापूर जिल्ह्यातील बाधित भागात दाखल झाले आहेत.
‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्याचा तपशील
५ नोव्हेंबर: पैठण (नांदर), बीड (पाली), धाराशिव (पाथ्रुड, शिरसाव), सोलापूर (घारी)
६ नोव्हेंबर: धाराशिव (करजखेडा), लातूर (भुसणी), अहमदपूर (थोरलेवाडी), नांदेड (पार्डी)
७ नोव्हेंबर: नांदेड (पार्डी), हिंगोली (डोंगरकडा, जवळाबाजार)
८ नोव्हेंबर: परभणी (ताडबोरगाव, ढेगळी पिंपळगाव), जालना (पाटोदा, लिंबोनी)
या दौऱ्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून शासनाच्या मदत वितरण व्यवस्थेतील त्रुटी, विमा योजना अंमलबजावणीतील उशीर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समजून घेत आहेत.
अतिवृष्टीने मराठवाडा हादरला
मागील महिन्यात धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांची शेती पाण्याखाली गेली, तर काहींची मातीच वाहून गेली. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. “शेतकऱ्यांच्या दु:खात सरकार दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणा करून उपयोग नाही, प्रत्यक्ष मदत हवी. शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सदैव उभे राहू,” असे ठाम वक्तव्य ठाकरे यांनी केले.



