नागपूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी मतमोजणीच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप नेते निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आयोगावर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. “निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. नियोजनाप्रमाणे ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे आता मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या, पण असा पोरखेळ कधीच पाहिला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असा स्पष्ट आदेश दिला होता. मात्र आयोगाने त्याचा अभ्यास न करता कोणाच्या तरी दबावाखाली तारखा जाहीर केल्या आणि सावळा गोंधळ माजवला.” वडेट्टीवार यांनी आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही थेट शंका उपस्थित केली. “आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कोणाच्या संकेतावर निर्णय घेत आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. बुद्धी शाबूत असती तर कोर्टाचा अभ्यास केला असता. गेल्यावेळी ३७९ जागा रिक्त राहिल्या, आता पुन्हा तीच परिस्थिती. याला आयोगच जबाबदार आहे,” असे त्यांनी म्हटले.
भाजपवर निशाणा साधत वडेट्टीवार म्हणाले, “सात-आठ वर्षांनी निवडणुका होत असतील तर त्या सुरळीत पार पडायला हव्या. उद्या ईव्हीएम हॅक झाले तर जबाबदार कोण? जर सर्व काही तुमच्या मनासारखेच करायचे असेल, तर निवडणुकांचा फार्स न करता भाजपला थेट विजयी घोषित करा.”
यावेळी त्यांनी देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचा आरोपही केला.



