Home » जळगाव » गोलाणी मार्केटमध्ये दोन्ही गटात जोरदार हाणामारी !

गोलाणी मार्केटमध्ये दोन्ही गटात जोरदार हाणामारी !

जळगाव : प्रतिनिधी

मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या दुकानावर चोरीच्या संशयावरुन ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद झाला. त्यांचे वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मार्केटमध्ये अफवांना पेव फुटल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये घडली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. या गजबजलेल्या मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळीच्या सुमारास एक तरुण त्याच्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्तीसाठी आला होता. त्याठिकाणी दुकानात मालकाने त्याचा गॉगल काऊंटरवर ठेवलेला होता. तो गॉगल मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या तरुणाने घालून तो काही अंतरावर मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी तरुणाने आपला गॉगल चोरला या संशयावरुन दुकानदार आणि ग्राहकामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. दरम्यान, दोघांनी फोन करीत बाहेरुन काही तरुणांना बोलावून घेतले. दोन्ही गटातील तरुण मार्केटमध्ये येताच पुन्हा गोंधळ निर्माण होवून त्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. त्यामुळे मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या दोघांना तात्काळ ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध शहर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अचानक झालेल्या गोंधळामुळे याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अचानक दोन गट समोरासमोर येवून हाणामारी होवून गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लागलीच आपली दुकाने बंद केली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेत करीत वातावरण निवळले, त्यानंतर काही वेळातच गोलाणी मार्केट पुन्हा सुरू करण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *