कल्याण : वृत्तसंस्था
राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे, तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार आहेत. महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू असून, मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांसह कलाकारही सक्रिय होताना दिसत असून, मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

कल्याण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, “हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या,” असे आवाहन केले. तसेच मतदान करताना सामाजिक हिताचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीतील निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना पोंक्षे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत हिंदूंना दोन प्रकारच्या लढाया लढाव्या लागतात. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा,” हे वाक्य मनात कोरून ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी गांधी परिवारावरही जोरदार टीका केली. “तीन माणसांचे घर चालवता येत नाही, त्यांनी १४० कोटींचा देश कसा चालवायचा हे शिकवू नये,” असा घणाघात शरद पोंक्षे यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी हलालच्या वस्तू वापरू नयेत तसेच विशिष्ट समुदायाकडून खरेदी करू नये, असे विधान करत दोन्ही लढाया संविधानाने दिलेल्या अधिकारांतर्गत गुप्तपणे लढायच्या असल्याचे म्हटले. हिंदू राष्ट्र उभारण्यासाठी सामान्य नागरिकांनी कोणत्या लढाया जिंकायच्या आहेत, याचे मार्गदर्शन आपण केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



