Home » महाराष्ट्र » कोपरगावमध्ये मतदानाला गालबोट : मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादी समर्थक आमने-सामने !

कोपरगावमध्ये मतदानाला गालबोट : मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादी समर्थक आमने-सामने !

नाशिक : वृत्तसंस्था

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानाला दुपारच्या सुमारास अचानक तणावाचे वळण लागले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला.

मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याने परिस्थिती अधिक चिघळली. हा वाद पोलिसांच्या उपस्थितीतच उफाळून आला. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून दूर हटवले.

या कारवाईदरम्यान काही मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ मतदानाचा वेग मंदावला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे.

दुपारनंतर मतदारांची गर्दी पुन्हा वाढताना दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १८ टक्के मतदान झाले होते. थंडीमुळे सकाळी मतदानाचा वेग काहीसा कमी असला तरी दुपारच्या सत्रात नागरिकांचा सहभाग वाढल्याचे दिसून आले.

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पारंपरिकदृष्ट्या काळे आणि कोल्हे या दोन राजकीय गटांच्या वर्चस्वाची मानली जाते. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, सकाळपासून मतदान केंद्रांवर दोन्ही गटांचे कार्यकर्ते सक्रिय होते. दुपारी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे आरोप करण्यात आले आणि त्यातूनच वादाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून शहरातील इतर मतदान केंद्रांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गस्त वाढवण्यात आली असून, शांततेत मतदान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *