जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलिसांनी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले. ‘वॉश आऊट’ या विशेष शोध मोहिमेअंतर्गत झालेल्या धडक कारवाईत ८४ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

ही मोहीम पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव शहरातील विविध संवेदनशील भागांमध्ये राबवण्यात आली. विशेषतः जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका, रामानंद नगर व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील परिसर या कारवाईचे केंद्रबिंदू होते. पोलीसांनी अटक केलेल्यांमध्ये हद्दपार गुन्हेगार, फरार आरोपी, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि अवैध दारू विक्रेते यांचा समावेश आहे. काही गुन्हेगार हे विनापरवानगी शहरात परत आलेले असल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्या विरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी कारवाईचे सखोल नियोजन केले होते.
या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक सागर शिंपी (शहर), कावेरी कमलाकर (शनिपेठ), बबन आव्हाड (एमआयडीसी), प्रदीप ठाकूर (जिल्हापेठ), अनंत अहिरे (तालुका), राजेंद्र गुंजाळ (रामानंदनगर) यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही राबवण्यात येणार आहेत. ही कारवाई केवळ सुरुवात असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



