Home » राष्ट्रीय » महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली ; मुख्यमंत्री फडणवीस !

महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था

आज राज्यभरात दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठाण्यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव नेहमीच चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर लावण्यास कोण सरस ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आज मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस असूनही गोविंदा पथकांचा जराही उत्साह कमी झालेला नाही.

विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या निवडणुकी निमित्त अनेक राजकीय पक्षाकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय नेते व सेलिब्रिटींची उपस्थिती दिसून येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभरात मुंबईतील दहीहंडी उत्सवांना भेट देताना दिसत आहेत. दुपारी 1 वाजता त्यांनी वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवापासून याची सुरुवात केली. तर, पत्रकारांशी बोलताना यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं. दहीहंडी मंचावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवर्तन दहीहंडीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतल जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे” असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “दहीहंडीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशी सर्वांना विनंती आहे” इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं” असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *