Home » महाराष्ट्र » इथे काय होणार ते आम्ही ठरवणार : मनसे नेत्याचा थेट इशारा !

इथे काय होणार ते आम्ही ठरवणार : मनसे नेत्याचा थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मनसे, ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली.

विशेष म्हणजे मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्रालय आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याशिवाय स्वत:मोर्चामध्ये सहभागी होण्यास जाणार आहे, हिंमत असेल तर अडवा असे आव्हान पोलिसांना त्यांनी दिले. त्यानंतर सरनाईक मोर्चामध्ये सहभागी झाले देखील मात्र आंदोलनकर्त्यांच्या रोषामुळे त्यांना माघारी फिरावे लागले.

मीरा भाईंदर येथे मराठी मोर्चा काढण्यात आला. मराठी एकीकरण समितीसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चाला शिवसेना उबाठा आणि मनसेच्या नेत्यांनी संबोधित केलं.

यावेळी बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मीरारोडमध्ये मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला मारहाण झाली, तेव्हाच मी म्हटलेलं इथे व्यापार करायला आलात, तर व्यापार करायचा. मराठी माणसाचा बाप बनायचा प्रयत्न नाही करायचा, मराठीचा अपमान कराल, तर कानाखाली बसेल, असा थेट इशारा देशपांडे यांनी दिला. ‘दोन हजार मैलांवरुन इथे येऊन दादागिरी नाही करायची. इथे काय होणार ते आम्ही ठरवणार, इथला मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना, मग धंदा करा. इथल्या राजकारणात लुडबूड नाही करायची. चड्डीत राहायचं. इथे येऊन माज नाही दाखवायचा,’ अशा शब्दांत देशपांडे यांनी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता इशारा दिला.

‘गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत असल्याचे प्रताप सरनाईकांनी सांगितले. तसेच पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे ते म्हणाले.

पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कुणा एका पक्षाचा अजेंडा चालवू नये, असा हल्लाबोल प्रताप सरनाईक यांनी केला होता.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *