कोल्हापूर : वृत्तसंस्था
दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी उत्साहाचा असतो. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली पणती ही वसुबारस सणाने प्रज्वलित करून शुक्रवार, दि. १७ पासून वसुबारसने दिवाळीला प्रारंभ होत आहे. गाय-वासराचे पूजन करून हिंदू संस्कृतीतील गोमातेचे महत्व अधोरेखित केले जाते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वसुबारस साजरा केला जातो. शहरात गायवासराच्या मूर्तीचे पूजन करून दिवाळीची नांदी होणार आहे.
हिंदू संस्कृतीत दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा होणारा हा सण, ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे धन किंवा संपत्ती आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी. हा दिवस गाय आणि वासराच्या पूजनाने सुरू होतो. यामुळे परात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. वसुबारस हा केवळ धार्मिक विधींचा सण नसून निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारा दिवस आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणते धार्मिक विधी करावे
वसुबारसच्या दिवशी घरांमध्ये विशेष विधी पाळले जातात. गायी आणि वासरांना आंघोळ घातली जाते, त्यांच्या अंगावर हळद लावली जाते आणि त्यांना नवीन कपड्यांनी सजवले जाते. या दिवशी गुरांना अंकुरलेले मूग आणि हरभरा खायला दिले जातात. महिला गहू आणि मूग वर्ज्य करून उपवास करतात आणि फक्त बाजरी भाकरी आणि चवळीच्या कढीने उपवास पूर्ण करतात.
वसुबारस हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही; तो शेती आणि कुटुंब कल्याणासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरात समृद्धी, मुलांचे आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या सुरुवातीच्या काळात रांगोळी काढणे आणि तुळशीच्या रोपासमोर आणि दारात दिवे लावणे ही या दिवशीची खास परंपरा आहे. संध्याकाळी, गायीची पूजा करून एक विशेष आरती केली जाते.
वसुबारसने दिवाळी साजरी करण्याचा प्रारंभ होणार असून त्यानंतर पाच दिवस दिवाळीची धामधूम सरू होणार आहे. शनिवारी धनत्रयोदशी, सोमवारी नरकचतुर्दशी, मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी दीपावली पाडवा व गुरुवारी भाऊबीजेने दिवाळीची सांगता होणार आहे.
